
कराड : बेकायदा कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी आठ जनावरांची सुटका केली. तसेच कत्तल केलेल्या जनावरांचे सुमारे २१० किलो वजनाचे अवशेषही जप्त करण्यात आले. शहरातील मुजावर कॉलनीत शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान सिकंदर शेख (वय ३४, रा. चांद पटेल वस्ती, कराड) व समीर जावेद नदाफ (रा. इदगाह मैदानमागे, कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत प्राणी कल्याण अधिकारी वैभव किरण जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीमध्ये असलेल्या एका राहत्या इमारतीखाली असलेल्या गाळ्यांमध्ये बेकायदेशीररित्या कत्तलखाना चालविला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक डी. एस. देवकर यांच्यासह अधिकाऱ्याना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रात्री पोलीस पथकासह प्राणी कल्याण अधिकारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी संबंधित गाळ्याचे शटर उघडून पाहिले असता गाळ्यामध्ये आठ जनावरे क्रूररित्या बांधल्याचे दिसून आले. तसेच जनावरांचा आवाज येऊ नये, यासाठी त्यांचे तोंडही क्रुरपणे बांधण्यात आले होते. पोलिसांनी दुसºया गाळ्यात पाहणी केली असता त्याठिकाणी कत्तल केलेल्या जनावरांचे सुमारे २१० किलो वजनाचे अवशेष आढळून आले. तसेच लोखंडी सुरे, काणस, वजनी काटा आदी वस्तूही आढळून आल्या. पोलिसांनी जनावरांची सुटका करून साहित्य जप्त केले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
Tags
crime news Karad Satara