अर्थमंत्री अजितदादांची निधी वाटपाबाबत मंत्र्यांसोबत बैठक, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच चर्चा

मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत निधीवाटपाबाबत विशेष बैठक घेतली. प्रत्येक खात्याच्या विविध योजना लक्षात घेता साधारण किती निधी लागू शकतो, याचा अंदाज आणि मंत्र्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
खातेवाटपावेळी काही मंत्र्यांना योजनांकरता योग्य निधी दिला जाईल, असे अर्थ आणि नियोजन मंत्री या नात्याने अजित पवार यांनी आश्वासित केले होते. त्यानुसार विविध विभागाच्या मंत्र्यांच्या योजनांचा आढावा आणि निधीची गरज अजित पवार यांनी संबंधितांकडून जाणून घेतली.
या बैठकीला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पर्यावरण आणि पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा विभागाचे मंत्री दत्तात्रय भरणे, ओबीसी विकास ऊर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
या बैठकीत पर्यटन विभागाअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या विस्तारित महाबळेश्वर प्रकल्पासाठी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई निधीची मागणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पर्यटन, अल्पसंख्यांक, दुग्धविकास आणि ग्रामपंचायत या विभागांमधील योजनांकरता निधींच्या मागण्यांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती कळते.
महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीची अवस्था फारशी बरी नसल्याने विविध योजनांना कात्री लावण्याचे नियोजन सुरू असल्याचे कळते. विविध योजनांचा सरकारच्या तिजोरीवर भर पडतो आहे. त्यात लाडकी बहीणमुळे तिजोरीवर मोठा भार आहे. त्यामुळे विकासाच्या इतर योजनांना कात्री लावावी लागणार असल्याचे निश्चित आहे.