
कराड : वारूंजी फाटा, ता. कराड येथील अन्नपुर्णा हॉटेलसमोर काळवीट या वन्य प्राण्याची शिंगे जवळ बाळगून तस्करी करताना चौघांना वनविभागाने ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईमध्ये त्यांच्याकडून काळवीटाची चार शिंगे व चार मोबाईल हॅन्डसेट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत आरोपींना जप्त शिंगे ही पाटण येथील रहिवाशी चंद्रशेखर भिकाजी निकम (सेवानिवृत्त रेल्वे पोलीस) यांच्याकडून मिळाली असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. काळवीटाच्या अवयव तस्करी प्रकरणात एका निवृत्त रेल्वे पोलिसाचा सहभाग असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
रत्नाकर हणमंत गायकवाड (वय 42) रा. इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली, अमर भगवान खबाले (वय 35) रा. कराड यांच्यासह इलाई सय्यद शेख (वय 50) मुळ रा. कराड व विशाल संभाजी शिंदे (वय 31) रा. कराड अशी ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार, दि. 12 रोजी वारूंजी फाटा, ता. कराड येथील अन्नपुर्णा हॉटेलसमोर काळवीट या वन्य प्राण्याची शिंगे जवळ बाळगून तस्करी करण्याच्या उद्देशाने दोघेजण आल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीनुसार उपवनसंरक्षक (सातारा) श्रीमती आदिती भारव्दाज व सहा. वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्पा – सातारा) महेश झाझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षेत्रपाल कराड, वनपाल वराडे व इतर वन कर्मचारी यांनी संयुक्तरित्या मौजे वारूंजी फाटा येथे सापळा रचला. तसेच येथील अन्नपुर्णा हॉटेलसमोर काळवीट या वन्य प्राण्याची शिंगे जवळ बाळगून तस्करी करीत असताना आरोपी रत्नाकर हणमंत गायकवाड, रा. इस्लामपूर व अमर भगवान खबाले रा. कराड यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता, सदर तस्करीमध्ये अजून दोन व्यक्ती सामील असल्याचे समजले. त्यानुसार इलाई सय्यद शेख (वय 50) मुळ रा. कराड व विशाल संभाजी शिंदे (वय 31) रा. कराड यांनाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटक केली. तसेच सदर आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत आरोपींना जप्त शिंगे ही पाटण येथील रहिवाशी चंद्रशेखर भिकाजी निकम (सेवानिवृत्त रेल्वे पोलीस) यांच्याकडून मिळाली असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. या प्रकरणाचा तपास वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
या कारवाईत कराड वनक्षेत्रपाल टी. डी. नवले, पाटण वनक्षेत्रपाल आर. एस. नलवडे, वराडे वनपाल सागर कुंभार, मलकापूर वनपाल आनंदा जगताप, कोळे वनपाल बाबुराव कदम, वराडे वनरक्षक सचिन खंडागळे, म्होप्रे वनरक्षक शितल पाटील, नांदगाव वनरक्षक अभिजीत शेळके, म्हासोली वनरक्षक सुभाष गुरव, कोळे वनरक्षक शंकर राठोड, मलकापूर वनरक्षक कैलास सानप व इतर वन कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
वन्यप्राण्याची शिकार व अवयवाची तस्करी करीत असताना कोणी निदर्शनास आल्यास टोल फ्री क्र. १९२६ वर किंवा नजीकच्या वनक्षेत्रपाल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

