
कराड ः दुर्गा देवीचे विजर्सन करण्यासाठी कृष्णा नदी पात्रात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वाठार (ता. कराड) येथील युवक मालखेड गावच्या हद्दीत मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेल्यानंतर काळाने घाला घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, परिसरातील मच्छिमारांच्या मदतीने शोध मोहिम राबविल्यानंतर संबंधिताचा मृतदेह शोधण्यात तालुका पोलिसांना यश मिळाले आहे.
लक्ष्मण औदाप्पा गंगनमल्ली असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मूळचे कर्नाटकातील इंडी परिसरातील असलेले गंगनमल्ली कुटूंब मोलमजुरीसाठी काही वर्षांपूर्वी कराड तालुक्यातील वाठार येथे स्थायिक झाले आहे. याच कुटुंबातील लक्ष्मण औदाप्पा गंगनमल्ली (वय 25) हा युवक बांधकाम व्यावसायिकाच्या बेळगावमधील साईटवर नोकरीला होता. दुर्गा उत्सवासाठी तो दोन दिवस सुट्टी काढून गावी आला होता. मालखेड गावातील कृष्णा नदी पात्रात दुर्गादेवीचे विसर्जन करण्यासाठी मंडळाचे तरूण गेले होते. त्यावेळी लक्ष्मण हाही नदीच्या पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या वेगवान प्रवाहात काही अंतर वाहत जाऊन तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पोलीस कर्मचार्यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. नदीत मोठ्या प्रमाणावर असल्याने स्थानिक मच्छीमारांना बोलावून घेत शोध मोहिम राबवली आणि त्यानंतर मृतदेह सापडल्याचे पोलीस निरीक्षक महेंंद्र जगताप यांनी सांगितले आहे.