
कडेगाव : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. ‘न भूतो, न भविष्यती’ असा पाऊस कोसळला असून नागरिकांची दाणादान उडाली आहे, शेतकऱ्यांची पिके तर वाहून गेली आहेतच, पण जमिनी देखील वाहून गेल्या आहेत, अनेक लोक मृत्युमुखी पडली आहेत, त्याचबरोबर हजारो जनावरे देखील मृत्युमुखी पडली आहेत. इतकी प्रचंड मोठी वाताहत याठिकाणी झाली आहे. या संकटातून आता पुढे काय? हा भीषण सवाल त्याठिकाणच्या लोकांच्या पुढे आहे. शासन मदत करेल, न करेल आपली जबाबदारी आणि स्व.डॉ.पतंगराव कदम साहेब यांचे संस्कार या भावनेतून राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या वतीने मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना डॉ.पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी व भारती विद्यापीठाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली.
यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, भारती हेल्थ सायन्सच्या अध्यक्षा डॉ.अस्मिताताई जगताप, माजी आमदार विक्रम सावंत, भारती बँकेचे संचालक युवा नेते डॉ.जितेश कदम, डॉ. नितिन नायक आदी उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या मदतीनंतर सुद्धा येणाऱ्या दिवसात आणखी मदत पाठविण्यात येणार आहे, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांना तसेच ज्या शेतकऱ्यांचे पशुधन या पुरात उध्वस्त झाले आहे, अश्या शेतकऱ्यांना देखील डॉ.पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी व भारती विद्यापीठाच्या माध्यमातून मदत देण्यात येणार आहे.
पुराच्या यातना किती भयंकर असतात याची पुर्णतः जाणीव आमदार डॉ.विश्वजीत कदम यांना आहे, कारण २००५ चा पूर असू दे किंवा २०१९ चा महापूर असो पलूस-कडेगावने तो अनुभवला आहे, त्याहूनही जादा तो आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी अनुभवला आहे, त्यांनी त्यावेळी पुरग्रस्तांच्यासाठी प्रत्यक्ष पाण्यात उतरून केलेले काम अखंड महाराष्ट्र व देशाने पाहिले होते, पुराच्या काळात व पूर ओसल्यानंतर सुद्धा त्यांनी मोठं काम केले, लोकांना मदत केली, गावे स्वच्छ केली, आरोग्याची काळजी घेतली, लोकांच्या सोबत पशुधनाची सुद्धा काळजी घेत त्यांना सुद्धा जगवण्याचे काम आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी केले, पूर, महापूर, दुष्काळ, कोरोना या सगळ्या आपत्तीत लोकांच्या पुढे छातीचा कोट करून लढणारा हा नेता असून आज त्याच भावनेतून कोणता भाग, परिसर, जिल्हा किंवा मतदारसंघ न पाहता केवळ शेतकरी आणि सर्वसामान्य जनता या समर्पण भावनेतून त्यांनी ही मदत केली आहे, आणि येणाऱ्या काळात सुद्धा मदतीचा हा ओघ असाच कायम राहणार असून या मदतकार्यात लोकांना सावरण्यात त्यांनी पुढाकार घेत मदतीचा हात दिला आहे.
डॉ.पतंगराव कदम आणि ‘मदत आणि पुनर्वसन’…..
शेतकऱ्यांना ज्या-ज्या वेळी आपत्तीचा सामना करावा लागला तेव्हा, मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने कोणत्याही काना-मात्रा न बघता स्व.डॉ.पतंगराव कदम यांनी मदत केली, मग तो दुष्काळ असो, महापूर असो किंवा माळीण सारखी दुर्घटना असो या नेत्याने सर्वसामान्य लोकांना मदत करताना कधीच हात आखडता घेतला नाही, त्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच आजही कोणत्याही आपत्तीत राज्यातील जनतेला डॉ.पतंगराव कदम या नेत्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.