
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देशमुखनगर (ता. सातारा) येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात एकूण ११७ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी तब्बल ७९ तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. देशमुखनगर परिसरातील ग्रामस्थांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा जनता दरबार यशस्वी ठरला.
जनता दरबारात उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी निलेश पाटील, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक तुषार पाटील, नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, सपोनि धोंडीराम वाळवेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष पवार, सातारा ग्रामीण वीज वितरण कार्यालयाचे उप अभियंता सिकंदर मुलाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यशवंत ढाणे, बाबासाहेब घोरपडे, सचिन देशमुख, शैलेंद्र आवळे, राहुल गायकवाड, अजय अवताडे, अॅड. धनाजी जाधव पाटील, ज्ञानदेव निकम, सुधीर जाधव, पृथ्वीराज निकम, संतोष घाडगे, विठ्ठल देशमुख, प्रशांत कणसे उपस्थित होते.
आ. मनोज घोरपडे म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. गावोगावी विकासकामे राबवण्यासाठी जनतेचे सहकार्य अत्यावश्यक आहे. महसूल, वीज व भूमी अभिलेख विभागाशी संबंधित तक्रारींची संख्या जास्त असली, तरी या जनता दरबारामुळे सामान्य नागरिकांचा त्रास कमी झाला असून समस्या तत्काळ निकाली काढण्याचा माझा प्रयत्न कायम राहील. सेवा पंधरवडा या निमित्ताने शेतीतील पाणंद रस्ते खुले करण्याबाबत लोकाभिमुख उपक्रम शासनाचा सुरू आहे. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे.
यावेळी तहसीलदार समीर यादव व गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी सेवा पंधरवडा उपक्रमाबाबत माहिती देत ग्रामपंचायतींच्या योजना व रस्ते विकासाच्या कामांचा आढावा मांडला. सूत्रसंचालन माजी सरपंच प्रशांत कणसे यांनी केले. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.
नागरिकांनी मानले आ. मनोजदादांचे आभार
नागठाणे व वर्णे गटातील सर्व महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या विविध अडचणी मांडल्या. समस्यांचे गा-हाणे गायले. आ. मनोजदादा घोरपडे यांनी हे सर्व प्रश्न समजावून घेत जागीच सोडवले. काही प्रश्न मार्गी लावण्याची प्रक्रिया केली. समस्या जागेवरच सुटल्याने नागरिकांनी आ. मनोजदादा घोरपडे यांचे आभार मानले.