
कराड ः सैदापूर, ता. कराड येथे कृष्णा कॅनॉल परिसरात बेकायदा पिस्तूल घेवून फिरणाऱ्या दोघांना डीवायएसपी कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलसह जीवंत राऊंड, मोबाईल, व एक दुचाकी असा एक लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अल्तमेश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय 25, रा. पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड) व ओमकार दिपक जाधव (वय 22, रा. होली फॅमीली हायस्कुलजवळ, विद्यानगर, सैदापुर, ता. कराड) अशी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर येथील कृष्णा कॅनॉल परिसरात संशयीत अल्तमेश ऊर्फ मोन्या तांबोळी व ओमकार जाधव हे दोघेजण पिस्तुल घेवून फिरत असल्याची माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांना मिळाली होती. या माहितीनुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस अंमलदार प्रविण पवार, सागर बर्गे, प्रशांत चव्हाण व मयुर देशमुख यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पोलीस पथकाने कृष्णा कॅनॉल परिसरात सापळा रचला. त्यावेळी अल्तमेश ऊर्फ मोन्या तांबोळी व ओमकार जाधव हे दोघेजण त्याठिकाणी आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 50 हजार रूपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल, 600 रूपये किमतीचा जीवंत राऊंड, 15 हजार रूपये किमतीचा मोबाईल आणि 75 हजार रूपये किमतीची एक दुचाकी असा एकूण 1 लाख 40 हजार 600 रूपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी ते जप्त करून संशयीतांना अटक केले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


