राज्यसातारा

कोरेगाव तहसीलमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; १.२५ लाखांची लाच स्वीकारताना सापळ्यात अडकले अधिकारी, एसीबीची धडाकेबाज कारवाई

कराड : सातारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत कोरेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून आनंद कैलास शिंदे (पद – पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय, कोरेगाव) तसेच त्यांचा सहकारी अवघूत दिलीप काळे (खाजगी इसम) यांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे कोरेगाव येथील भारत गॅस एजन्सी चालवत असून, गॅस वितरणाच्या शासकीय नियमांनुसार काम करत असतानाही आरोपी लोकसेवक आनंद शिंदे यांनी एजन्सीची तपासणी न करता तसेच एजन्सीविरुद्ध आलेल्या तक्रारींवर कारवाई न करण्यासाठी सुरुवातीला २,००,००० रुपयांची लाच मागितली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने दिनांक ०१/०४/२०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा येथे तक्रार नोंदवली.

तक्रारीची पडताळणी दिनांक ०२/०४/२०२६ रोजी करण्यात आली असता लाच मागणीसंदर्भात तथ्य निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती लाचेची रक्कम १,२५,००० रुपये निश्चित करण्यात आली. त्यानुसार दिनांक ०६/०४/२०२६ रोजी सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवकाच्या सांगण्यावरून त्यांचा सहकारी अवघूत काळे यांनी तक्रारदाराकडून १,२५,००० रुपयांची लाच जनसेवा सहकारी बँक, कोरेगाव परिसरात पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक श्री. सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली. पथकात पो. हवालदार गणेश ताटे, पो. हवालदार निलेश राजपूत, पो. कॉन्स्टेबल त्रिंबकसिंह कडम, पो. कॉन्स्टेबल सत्यवान घोरपडे, पो. कॉन्स्टेबल नवनाथ शिंदे तसेच चालक पो. हवालदार महेश पुजारी यांनी महत्वाची भूमिका बजावली. तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीमती सुजाता गावडे यांनी काटेकोर तपासाची जबाबदारी सांभाळली.
या कारवाईस सातारा जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा जिल्ह्यात सातत्याने धडाकेबाज कारवाया करत असून, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेतल्यामुळे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरत आहे. त्यांच्या सूक्ष्म नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे अशा कारवायांना यश मिळत असल्याचे दिसून येते.

सदर प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास न घाबरता तक्रार नोंदवावी, जेणेकरून अशा भ्रष्ट प्रवृत्तींवर प्रभावीपणे आळा घालता येईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close