राज्यसातारा

गरीबांच्या डोक्यावर पक्कं छप्पर देण्यासाठी अतुल भोसले मैदानात; विरोधक मात्र ‘हिशोब’ घेऊन राजकारणात?

कराड : पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या डोक्यावर गेली अनेक वर्षे असलेले असुरक्षित छप्पर कधी पक्क्या घरात बदलेल, हा प्रश्न त्या गरीब कुटुंबांसाठी केवळ राजकीय मुद्दा नाही, तर त्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नावर आता ‘कोणी काय केले?’ यापेक्षा ‘या लोकांना पक्की घरे कशी मिळतील?’ हा एकमेव प्रश्न महत्त्वाचा ठरला पाहिजे.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आमदारकीची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या २० महिन्यांत या प्रश्नाला कागदोपत्री आणि प्रशासकीय प्रक्रियेत पुढे नेण्यासाठी जे प्रयत्न केले, ते पाहता त्यांच्या भूमिकेला विरोध करण्याऐवजी सर्वपक्षीयांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र कोणाला आमदारांसोबत राहून मदत करायची नसेल, तरीही त्यांनी विरोधक म्हणून आपल्या पद्धतीने शासनावर दबाव निर्माण करून या गरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण राजकीय विरोध असू शकतो; पण गरीबांच्या घराच्या स्वप्नाला विरोध असता कामा नये.

पाटण कॉलनीतील नागरिकांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केवळ आश्वासनांची भाषा केली नाही, तर प्रत्यक्ष प्रशासकीय मार्ग निवडला. १० डिसेंबर २०२४ रोजी नगरपरिषदेकडे पत्र, १६ डिसेंबर रोजी नगरपरिषदेचा शासनाकडे प्रस्ताव, १८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट, त्यानंतर नगररचना विभागाच्या पातळीवर पाठपुरावा आणि अखेर ५ मे २०२६ रोजी नगरविकास विभागाकडून पुढील कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश ही संपूर्ण प्रक्रिया पाहिली तर या प्रश्नासाठी टप्प्याटप्प्याने मार्ग काढण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट होते. झोपडपट्टीतील नागरिकांना पक्क्या घरांपर्यंत पोहोचविण्यासाठी कायदेशीर, प्रशासकीय आणि शासनस्तरीय अडथळे पार करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी विरोधकांनीही सरकारवर दबाव आणला, आंदोलने केली, निवेदने दिली किंवा शासनदरबारी पाठपुरावा केला तरी त्याचे स्वागतच झाले पाहिजे.

पण प्रश्न असा आहे की, या प्रयत्नांना विरोध का? आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर टीका करणाऱ्यांनी एकदा पाटण कॉलनीतील एखाद्या गरीब कुटुंबाच्या झोपडीत जाऊन विचारावे त्यांना ‘कोणाच्या काळात किती पत्रे दिली?’ यापेक्षा घर कधी मिळणार याची चिंता आहे. पावसात गळणारे छप्पर, असुरक्षित निवारा आणि वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न यामुळे त्रस्त असलेल्या कुटुंबांना राजकीय श्रेय नको; त्यांना पक्क्या घराची चावी हवी आहे. मग एखादा लोकप्रतिनिधी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येत असेल, तर त्याला मदत करण्याऐवजी ‘तुम्ही काय केले?’ असा प्रश्न विचारत बसण्याचे राजकारण नेमके कोणासाठी? आणि जर आमदारांसोबत राहून मदत करायची नसेल, तर विरोधक म्हणून तुमच्याकडे आंदोलन करण्याचा, शासनावर दबाव आणण्याचा आणि प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडण्याचा मार्ग खुला आहे. पण तो मार्ग गरीबांना घर मिळवून देण्यासाठी वापरला पाहिजे, केवळ राजकीय आरोपांसाठी नव्हे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तब्बल दहा वर्षे आमदारकी होती. मुख्यमंत्री म्हणून राज्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या कार्यकक्षेत होती. केंद्रामध्ये पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. अशा प्रदीर्घ राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाच्या काळात पाटण कॉलनीतील नागरिकांच्या पक्क्या घरांचा प्रश्न का सुटला नाही, हा प्रश्न आज विचारला तर त्यावर मिरची लागण्याचे काहीच कारण नाही. उलट, आज जर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या २० महिन्यांच्या कामाचा हिशोब मागितला जात असेल, तर त्याच न्यायाने मागील दहा वर्षांचा आणि त्यापूर्वीच्या राजकीय जबाबदाऱ्यांचा हिशोबही जनतेने विचारला तर त्याला उत्तर द्यावे लागेल. गेल्या दहा वर्षांत पाटण कॉलनीसाठी नेमकी कोणती पत्रे दिली? कोणते प्रस्ताव पाठवले? मंत्रालयात किती वेळा पाठपुरावा केला? कोणत्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या? कोणते निर्णय झाले? आणि जर काही झाले नसेल तर का झाले नाही? याचे उत्तरही जनतेसमोर येणे गरजेचे आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्याबाबतही हाच प्रश्न अधिक तीव्रतेने उपस्थित होतो. जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून राजकीय भूमिका मांडत होते. त्यामुळे त्यांनीही जनतेला सांगावे की, त्या काळात पाटण कॉलनीतील नागरिकांसाठी त्यांनी नेमका कोणता पाठपुरावा केला? किती वेळा संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली? किती प्रस्तावांचा पाठपुरावा केला? आणि आता जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी या नागरिकांसाठी कोणते ठोस पाऊल उचलले? केवळ प्रसिद्धीपत्रक काढून प्रश्न उपस्थित करणे सोपे आहे; पण गरीबांच्या घरासाठी शासनाच्या दारात उभे राहणे, कागदपत्रे पुढे नेणे आणि निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करणे ही खरी कसोटी आहे. त्यामुळे जर आज आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना ‘तुम्ही २० महिन्यांत काय केले?’ असा सवाल केला जात असेल, तर ‘तुम्ही तुमच्या राजकीय जबाबदारीच्या काळात काय केले?’ तसेच जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आता तुम्ही या लोकांच्या साठी नक्की काय करणार या प्रश्नाचे उत्तर देण्याचीही तयारी ठेवावी.

आता काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक थेट प्रश्न विचारला जात आहे तुम्हाला पाटण कॉलनीतील नागरिकांना खरोखर पक्की घरे मिळावीत असे वाटते का नाही? जर उत्तर ‘होय’ असेल, तर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना हातभार लावा. त्यांच्यासोबत राहून मदत करणे शक्य नसेल तर विरोधक म्हणून तुमच्या पद्धतीने शासनावर दबाव निर्माण करा. आंदोलन करा, निवेदने द्या, मंत्रालयात पाठपुरावा करा, प्रशासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडा; पण प्रत्येक प्रयत्नाचा केंद्रबिंदू गरीबांच्या घराचा प्रश्न असला पाहिजे. मात्र जर आमदारांनी केलेल्या प्रत्येक प्रयत्नात दोषच शोधायचा, प्रश्न उपस्थित करायचा, प्रसिद्धी मिळवायची आणि त्यानंतर पुन्हा शांत बसायचे असेल, तर पाटण कॉलनीतील नागरिकांनी याचा अर्थ काय घ्यायचा? घरं मिळवून देण्याची इच्छा आहे की फक्त घरांचा प्रश्न जिवंत ठेवून राजकारण करण्याची? हा सवाल आता जनतेच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.

पाटण कॉलनीचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा, नेत्याचा किंवा राजकीय गटाचा विषय नाही; तो गरीब माणसाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ‘अतुल भोसले यांनी काय केले?’ या प्रश्नाबरोबर ‘तुम्ही काय केले आणि आता काय करणार?’ हा प्रश्नही विचारला गेला पाहिजे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या भूमिकेला विरोध असला तरी त्यांच्याविरोधात राहूनही या नागरिकांसाठी सकारात्मक दबाव निर्माण करता येतो. कारण विरोध म्हणजे केवळ टीका नव्हे; विरोध म्हणजे सरकारला अधिक वेगाने काम करण्यास भाग पाडणे, प्रशासनाला जाब विचारणे आणि जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणे. मग ही ताकद पाटण कॉलनीतील गरीबांसाठी वापरली जात असेल, तर त्याचे स्वागतच होईल. पण केवळ ‘तुम्ही काय केले?’ एवढे विचारून पुन्हा गप्प बसणे हा प्रकार या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा ठरेल.

आज पाटण कॉलनीतील नागरिकांना एकच अपेक्षा आहे राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा त्यांच्या घराचा प्रश्न मोठा समजा. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुरू केलेला प्रशासकीय मार्ग अंतिम निर्णयापर्यंत नेण्यासाठी त्यांना साथ द्यायची असेल तर साथ द्या; विरोधक म्हणून दबाव निर्माण करायचा असेल तर तसाही दबाव निर्माण करा; पण कोणत्याही परिस्थितीत या गरीबांच्या घराचा प्रश्न थांबता कामा नये. कारण आजचा खरा प्रश्न ‘अतुल भोसले यांनी २० महिन्यांत किती केले?’ एवढाच नाही; त्यासोबत ‘माजी मुख्यमंत्री असताना, दहा वर्षे आमदार असताना आणि केंद्रातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना तुम्ही काय केले?’ हा सवालही जनतेसमोर उभा आहे. या प्रश्नावर मिरची लागण्याऐवजी त्याचे उत्तर जनतेला द्यावे. शेवटी श्रेय कोणाला मिळेल यापेक्षा पाटण कॉलनीतील गरीब कुटुंबाच्या हातात पक्क्या घराची चावी कधी येणार, हा प्रश्न सर्वांपेक्षा मोठा आहे. आणि त्या चावीपर्यंत पोहोचण्यासाठी जो कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल सत्तेतून असो वा विरोधातून त्याने पुढे यावे, हीच या जनतेची खरी अपेक्षा आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close