राज्यसातारा

वाखाण रोड परिसरात झालेली धान्यावरील कारवाई, जप्त केलेल्या धान्याचा उगम शोधण्याचे प्रशासनासमोर आव्हान ? (भाग चौथा)

कराड : वाखाण परिसरातील खाजगी धान्य गोदामावर झालेल्या कारवाईने केवळ एक साठा जप्त केल्याची बाब समोर आणलेली नाही, तर संपूर्ण पुरवठा यंत्रणेच्या विश्वासार्हतेलाच हादरा दिला आहे. तब्बल २२२ पोत्यांवर कोणताही शासकीय शिक्का किंवा लेबल नसताना ते धान्य शासकीय असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले, ही बाबच स्वतःमध्ये अनेक गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरते. गरिबांच्या ताटातील अन्न जर अशा पद्धतीने वळवले जात असेल, तर हा केवळ गैरप्रकार नसून समाजाच्या विश्वासाशी केलेला घात मानला जातो.

या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ही कारवाई नेमकी कोणत्या ठोस माहितीच्या आधारे करण्यात आली? पुरवठा निरीक्षकांनी ही धाड नियोजनपूर्वक टाकली होती का, की केवळ वरवरच्या संशयावर आधारित ही कारवाई करण्यात आली? जप्त केलेल्या धान्याचा शासकीय साठ्याशी संबंध असल्याचे कोणते ठोस पुरावे त्यांच्या ताब्यात आहेत, याबाबत स्पष्टता होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, ही कारवाई केवळ आकड्यांचा गाजावाजा करून वास्तव लपवण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका निर्माण होते.

यापेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे, जर हे धान्य खरोखरच शासकीय असेल, तर ते कोणत्या रेशन दुकानदारांकडून या खाजगी व्यक्तीकडे पोहोचले? २२२ पोते म्हणजे एखाद्या किरकोळ व्यवहाराचा भाग नाही; हा मोठ्या प्रमाणावरचा साठा आहे. त्यामुळे या मागे एखादी संगनमताची साखळी कार्यरत असण्याची शक्यता अधिक बळावते. मात्र, पंचनाम्यात किंवा फिर्यादीत अशा कोणत्याही दुकानदाराचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे का, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे आणि तोच संशय अधिक गडद करतो.

जर पंचनाम्यामध्ये किंवा अधिकृत कागदपत्रांमध्ये धान्याच्या मूळ स्रोताचा उल्लेखच नसेल, तर ही कारवाई अपूर्ण आणि दिशाभूल करणारी ठरू शकते. कारण केवळ धान्य जप्त करून खरे दोषी कोण, हे उघड न करणे म्हणजे मूळ समस्येला हात न घालता वरवरची कारवाई केल्याचा भास निर्माण होतो. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

खाजगी व्यक्तीकडे शासकीय धान्य पोहोचणे ही बाब स्वतःमध्ये गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपाची आहे. जर हा प्रकार खरोखर घडला असेल, तर संबंधित दुकानदार, पुरवठा साखळीतील अधिकारी आणि मध्यस्थ यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, या सगळ्या साखळीतील नावे उघड करण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा आहे.

या घटनेमुळे पुरवठा निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या कार्यालयाच्या पारदर्शकतेवर थेट प्रश्न उपस्थित होत आहेत. तपासाची दिशा, पुराव्यांची मांडणी, आणि कारवाईची सुसंगती याबाबत स्पष्टता नसेल, तर ही संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असलेल्या यंत्रणेकडूनच जर अस्पष्टता आणि गोंधळ दिसू लागला, तर हा प्रकार अधिक चिंताजनक ठरतो.

आज गरज आहे ती या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि निर्भीड चौकशी होण्याची. जप्त धान्याचा उगम, संबंधित दुकानदारांची नावे, पुरवठा निरीक्षकांनी केलेल्या कारवाईमागील ठोस कारणे आणि पुरावे हे सर्व मुद्दे पारदर्शकपणे जनतेसमोर येणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, वाखाण येथील ही कारवाई केवळ दिखावा ठरून खऱ्या दोषींना वाचवण्याचा मार्ग मोकळा करेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

पुढील भागात – धान्य साठा केलेल्या व्यक्तीने धान्य शासकीय वितरणातले नसल्याचा दिलाय जबाब?

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close