
कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत जयसिंगपूर येथील पेपर विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला लाकडी दांडके व चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच जणांना कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा व डीवायएसपी पथकाने पुणे येथून अटक केली. पोलिसांनी संशयिताकडून एक पिस्टल, चाकू व लुटलेला मुद्देमाल सुमारे पस्तीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांना कराड येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शुभम महेश कदम (वय 29, रा. मलकापूर, ता. कराड), श्रीहरी धनाजी साळुंखे (वय 25 रा. बैलबझार रोड, गणपती मंदिराजवळ मलकापूर, ता. कराड), वरून विकास मोहिते (वय 28, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड), राहुल दिपक खडंग (वय 26, रा. उंब्रज, ता. कराड) व फिर्यादीचा कारचालक नवनाथ बाळासो चोरमुले (वय 31, रा. जयसिंगपूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत जयसिंगपूर येथील पेपर विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला लाकडी दांडके व चाकूचा धाक दाखवून मारहाण करत 5 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याची घटना आठवड्यापूर्वी घडली होती. याबाबतची फिर्याद व्यवसायिक निकेत श्रीभगवान बियाणी (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी कराड तालुका पोलिसात दिली होती. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी फिर्यादी व त्याचा चालक नवनाथ चोरमुले याचेकडे कसून तपास केला असता सदरच्या गुन्ह्यामध्ये चालकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवत संशयिताचा शोध सुरू केला. याकरीता डीबीचे सखाराम बिराजदार व पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील यांच्या दोन टीम तयार करून तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुरू केला. संशयित पुणे येथे असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी काही तासातच संशयितांना पुणे येथून शोधून काढले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल, एक चाकू व लुटलेली सुमारे रोकड व सोन्याची चैन असा सुमारे 34 लाख 55 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांना अवघ्या काही तासात अटक करून त्यांना कराड येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील, सहाय्यक फौजदार नितीन येळवे, पोलीस हवालदार धनंजय कोळी, संजय जाधव, सचिन निकम, किरण बामणे, सागर बर्गे, प्रफुल्ल गाडे, मयुर देशमुख यांनी केली.

