
कराड ः बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच बनावट दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. सैदापूर, ता. कराड येथे जिव्हाळा ढाब्यासमोर असलेल्या अपार्टमेंटमध्ये बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर येथील जिव्हाळा ढाब्यासमोर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी अपार्टमेंटमध्ये पोलिसांना बेकायदेशीररीत्या दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी अपार्टमेंटसमोर दोन कार उभ्या होत्या. संबंधित कारमध्ये दारूने भरलेले कॅनही होते. पोलिसांनी त्याठिकाणी थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता रसायनमिश्रीत बनावट दारू तयार करीत असल्याचे त्या तिघांनी सांगीतले. पोलिसांनी तेथून 10 लाख 50 हजार रूपये किंमतीच्या दोन कार, 10 हजार 500 रूपये किंमतीचे 210 लिटर स्पीरीट, 1 हजार 700 रुपये किंमतीचे टैंगो इसेन्स, 1 हजार 500 रुपये किंमतीचे फिल्टर, 2 हजाराची पाण्याची टाकी तसेच बनावट दारूच्या बाटल्या असा 11 लाख 38 हजार 550 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय सांडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डिसले करीत आहेत.
Tags
crime news Karad

