क्राइमराज्यसातारा

मिटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याप्रकरणी आबईचीवाडीतील एकावर गुन्हा दाखल

कराड : तालुक्यातील आबईचीवाडी येथे घरगुती वीज मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी दीड लाख रुपयांचे वीज देयक तसेच दहा हजार रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले असून कराड शहर पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकातील सहाय्यक अभियंता वैभव मदने, कनिष्ठ अभियंता किशोर निकम, वरिष्ठ तंत्रज्ञ किरण देवकर व प्रवीण सरवदे हे 14 जुलै रोजी आबईचीवाडी येथील अमृत सुर्वे यांच्या घरावरील वीजमीटरची तपासणी करण्यासाठी गेले. त्यावेळी उपस्थित अंकिता सुर्वे यांनी वीज मीटर दाखवले. सदर मीटर घराच्या भिंतीवर पत्र्याच्या पेटीत बसवलेले होते. पथकातील अधिकार्‍यांनी मीटर तपासले असता ते -65 टक्के कमी वेगाने चालत असल्याचे आढळले. मीटरमध्ये छेडछाड झालेली असल्याने तो उतरवून पंचनामा करून सीलबंद अवस्थेत जप्त करण्यात आला. त्यानंतर 15 जुलै रोजी सातारा येथील चाचणी विभागात फेरतपासणी करण्यात आली. गणेश सुर्वे यांच्या उपस्थितीत मीटर उघडण्यात आले असता, वायर कापून प्रतिरोधक बसविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वीज वापराची नोंद कमी होत असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकाराला वीज कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये थेट वीज चोरी मानून सुर्वे यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना मागील 12 महिन्यांचे 5 हजार 140 युनिट इतक्या वापराचे 1 लाख 53 हजार 510 रुपये देयक ठोठावण्यात आले. त्यासोबत दहा हजार रुपये तडजोड शुल्कही लावण्यात आले. तपासणीतील फोटो, पंचनामा, अहवाल, जप्त मीटर आदी कागदपत्रांसह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या देयकाची रक्कम भरली नसल्यामुळे वीज कंपनीने सुर्वे दाम्पत्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close