
कराड : लव्ह मॅरेज केल्याचा राग मनात धरून चौघांनी दोघा युवकांचे कराडजवळील ओगलेवाडीतून अपहरण करून त्यांना शिराळा तालुक्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळ आणून सोडत पोलीस केस केल्यास जिवंत ठेवणार नसल्याचे धमकी दिल्याचे शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आदिनाथ भाऊ गुरव (रा. हजारमाची ता. कराड ) याने याप्रकरणी अनिकेत अशोक माळी, अविनाश अशोक माळी, अजिंक्य अशोक माळी या तिघांसह अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. आदिनाथ गुरव हा सेंट्रींग व्यवसाय करतो. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संदेश सतीश ताटे करवडी फाटा येथून आण असा फोन सनी सूर्यवंशी यांनी आदिनाथ गुरव याला केला होता. त्यानंतर करवडी फाटा परिसरात आदिनाथ गुरव गेल्यानंतर अचानकपणे अल्टो गाडीमधून संशयित उतरले आणि त्यांनी संदेश ताटे याला शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी आदिनाथ गुरव याने संदेश ताटे याला सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आदिनाथ याला लव्ह मॅरेज केल्याच्या रागातून जबर मारहाण केली. मारहाणीनंतर संदेश ताटे आणि आदिनाथ गुरव या दोघांना अल्टोमध्ये घालून शिराळा तालुक्यातील खेड गावच्या परिसरात घेऊन गेले. गाडीत घालताना ताटे याला चाकूची मूठ मारण्यात आली आली. तसेच खेड येथे लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्याने मारहाण केली आहे. मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर आणून सोडत पोलीस केस केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली असल्याचे आदिनाथ गुरव यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.