
कराड ः येथील एस.टी. स्टॅन्ड समोर असणाऱ्या एस. एस. मोबाईल दुकानामध्ये नवीन घेतलेला मोबाईलचा प्रॉब्लेम दाखविण्यासाठी गेलेल्या युवकास सफाई सुरू असताना दुकानामध्ये ये-जा करताना चप्पलाची घाण दुकानामध्ये येत असल्याच्या कारणावरून दुकानातील कामगाराने शिवीगाळ दमदाटी करत छातीवर जोरात मारले. या मारहाणीत तो युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी मोबाईल दुकानातील कामगारास युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची फिर्याद कविता सूरज नलवडे (वय 42 रा. गजानन हौसिंग सोसायटी, पी. डी. पाटील नगर, गोवारे, ता. कराड) यांनी शहर पोलिसात दिली आहे.
अखिलेश सूरज नलवडे (वय 23, रा. गजानन हौसिंग सोसायटी, पी. डी. पाटील नगर, गोवारे, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अझिम चाँदबादशहा मुल्ला (रा. शिवाजीनगर, मलकापूर, ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कराड एस.टी. स्टॅन्ड समोर असणाऱ्या एस. एस. मोबाईल दुकानामध्ये अखिलेश याने घेतलेला मोबाईलला प्रॉब्लेम आला होता. तो दाखविण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी तेथे सफाईचे काम सुरू होते. अखिलेश दुकानामध्ये ये-जा करत होता. त्यावेळी कामगार अझिम मुल्ला याने अखिलेश यास तु सारखा आत बाहेर करू नको, तुझ्या चप्पलची घाण दुकानामध्ये येते असे सांगितले. त्यामुळे अखिलेश हा दुकानाबाहेर येऊन थांबला. त्यावेळी अझिम याने रागाने बाहेर येऊन अखिलेशला शिवीगाळ, दमदाटी करत छातीवर जोरात धक्का मारून खाली पडले. त्यानंतर अखिलेश पुन्हा उठून उभा राहिल्यानंतर त्यावेळी दुकानातील इतर कामगार भांडणे सोडविण्यासाठी बाहेर आले तरीही अझिम याने पुन्हा अखिलेशला धक्काबुक्की केली. त्यानंतर अखिलेशला मारहाणीमुळे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याचा तोल जाऊ लागला. त्यावेळी त्याची आई कविता व रोहण यांनी अखिलेशला गाडीवरून उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता घेऊन गेले. मात्र, त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अखिलेशची तपासणी करून तो मयत झाला असल्याचे सांगितले. अखिलेशला मारहाण करून त्याच्या मृत्यूस अझिम मुल्ला हा कारणीभूत असल्याची फिर्याद कविता नलवडे यांनी दिली असून याप्रकरणी अझिम मुल्ला याला पोलिसांनी अटक करून त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक श्रीसुंदर करीत आहेत.