
कराड ः आगाशिवनगर ता. कराड येथे किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दगड, विटा, फरशा, लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याने दोन्हीकडील आठजण जखमी झाले असून याप्रकरणी दोन्हीकडील सुमारे अठ्ठावीस जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कराड शहर पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
राहुल लुबाळ, यशवंत जावळे, मयुर जावळे, सागर जावळे, श्रीहरी साळुंखे, आदित्य पोळ, रोहित पोळ, नागेश पोळ अशी दोन्हीकडील जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर अमोल लाखे, रोहित लाखे, मोहित लाखे, शाहीद शेख, संभाजी जावळे, यशवंत जावळे, सचिन जावळे, मयुर जावळे, सागर जावळे, राणी जावळे, विद्या गवळी, वनिता लाखे, अर्चना जावळे, रोहित पोळ, आदित्य पोळ, अमर पोळ, हरिष पोळ, नागेश पोळ, किरण देवकर, अभिशेख जाधव व अनोळखी आठ जण (सर्व रा. आगाशिवनगर, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सागर संभाजी जावळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी फाटा ते ढेबेवाडी जाणारे रोडवर सन्मित्र गणेश व दुर्गादेवी मंडळाचे समोर तिकाटण्याजवळ सागर जावळे व त्याचा चुलत भाऊ यशवंत संजय जावळे व मयुर शंकर जावळे बोलत जात असताना राहुल लुबाळ याने आमचे तिघांचा रस्ता अडवून शिवीगाळ करून तुम्ही तुमच्या वस्तीतून खाली कशासाठी आला असे म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की करून तिघांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच दगडांनी मारहाण केली. त्यानंतर सागर जावळे घरी गेलेनंतर घरात सांगितलेवर घरातील व वस्तीतील लोक आलेनंतर रोहीत पोळ, आदित्य पोळ, अमर पोळ, हरीष पोळ, नागेश पोळ, किरण देवकर, अभिशेख जाधव व इतर अनोळखी चार ते पाच जण (सर्व रा. पोळ वस्ती, आगाशिवनगर, ता. कराड) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी सागर जावळे, यशवंत जावळे व मयुर जावळे तसेच फिर्यादीच्या घरातील व वस्तीतील लोकांना हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगदांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
तर याउलट श्रीहरी धनाजी साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोळ वस्ती आगाशिवनगर येथे सन्मित्र गणेश मंडळ येथे दांडिया खेळत असताना राहुल लुबाळ याने सागर जावळे व इतर दोन मुलांना तुम्ही येथे थांबू नका, असे म्हणालेचे कारणावरून मनात राग धरून अमोल लाखे, रोहित लाखे, मोहित लाखे, शाहीद शेख, संभाजी जावळे, यशवंत जावळे, सचिन जावळे, मयुर जावळे, सागर जावळे, राणी जावळे, विद्या गवळी, वनिता लाखे, अर्चना जावळे व अनोळखी दोन ते तीनजण (सर्व रा. दांगटवस्ती झोपडपट्टी आगाशिवनगर, ता. कराड) यांनी फिर्यादीच्या मंडळाजवळ येऊन बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी करून दगड, विटा, फरशा, लाकडी दांडक्याने मारहाण करून फिर्यादी व त्याचे मित्र आदित्य पोळ, नागेश पोळ, रोहित पोळ यांना जखमी केले. तसेच मंडळाचे समोर असलेली फोर्ड इन्डीवर गाडीचे काचा व सनरूफ फोडून सुमारे 50 हजाराचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अझरूद्दीन शेख करीत आहेत.



