
कराड ः कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ, चोरी झालेले सुमारे सात लाख रूपये किमतीचे 22 मोबाईल कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोधून काढले आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते मूळ मालकांना फोन परत देण्यात आले.
कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल गहाळ, चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी यांनी सी.ई.आर.आर.पोर्टलद्वारे पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार यांचे गहाळ, चोरी झालेले मोबाईल फोन शोधण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे सूचनेनुसार कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कर्नाटक राज्य तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून तांत्रिक् विश्लेषणाद्वारे माहिती घेऊन सुमारे सात लाख रूपये किमतीचे 22 मोबाईल फोन शोधून काढले. ते सर्व फोन शनिवारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामस्थांनी आपला मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवून तात्काळ कराड तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तसेच ceir.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
– महेंद्र जगताप,
पोलीस निरीक्षक, कराड तालुका पोलीस स्टेशन
डीबी पथकाचे ग्रामस्थांकडून आभार
कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतून सन 2025 मध्ये मोबाईल गहाळ, चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचा तपास करताना कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ह्या नऊ महिन्यात सुमारे 12 लाख रूपये किमतीचे 60 मोबाईलचा शोध घेऊन ते मूळ मालकांना परत करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांकडून डीबी पथकाचे आभार मानण्यात आले.