राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड
कृषीमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा; दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर !

मुंबई ः महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत हवामानातील असमतोलामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी विरोधी पक्षाकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात होती. आता दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यास सुरुवात झाल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त क्षेत्राचं केलेल्या सर्वेक्षणाचे अंतरिम नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आजपासून विम्याची रक्कम वितरीत करायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, नुकसानग्रस्त क्षेत्रांचं केलेल्या सर्वेक्षणात अंतरिम नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्या अहवालानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचनांना अनुसरून राज्यातील 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 1 हजार 743 कोटी रुपये एवढी पीक विम्याची रक्कम वितरीत करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.