
कराड ः सेवानिवृत्ती म्हणजे जीवनाचा शेवट नसून जीवनाचा नवा अध्याय आहे. रिटायर म्हणजे टायर बदलले आहेत, त्यांच्या कर्तुत्वाची गाडी आता अधिक वेगाने धावली पाहिजे असे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आ. च. विद्यालय मलकापूरचे पर्यवेक्षक भरत गणपती बुरुंगले आपल्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभ नुकताच शाळा व संस्थेच्यावतीने संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी सातारा जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी अनीस नायकवाडी हे अध्यक्ष स्थानी होते.
अनिस नायकवडी म्हणाले, सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला दोन किनारे असतात. एक आनंदाचा तर दुसरा दुःखाचा. शिक्षक आपल्या ज्ञानार्जनातून अनेक पिढ्या घडवितात. अशावेळी ते आपल्या परिवारास, नातेवाईकांना न्याय देऊ शकत नाहीत. परंतु सेवानिवृत्तीनंतर या सर्वांना न्याय देण्यास वेळ मिळणार आहे. हा बुरुंगले सरांसाठी आनंदाचा किनारा आहे. तर शाळा हेच घर मानून अहोरात्र शाळेचा विचार करणारे शिक्षक म्हणजे बुरुंगलेपं सर, त्यांना सेवेतून निवृत्ती मिळाली हा त्यांच्यासाठी दुःखाचा किनारा. ते पुढे म्हणाले, ज्यांची कर्तुत्वाची पाने भरतात त्यांच्या वाट्याला हा सोहळा येतो.
संस्थेचे सचिव अशोकराव थोरात बुरुंगले सरांना शुभेच्छा देताना म्हणाले, सरांनी नेहमीच संस्थेचा आदर करून, शाळेसाठी जास्त वेळ देऊन आपल्या पदाला न्याय दिला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा चंगच बांधला होता. त्यांचे विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत, उच्च पदस्थ आहेत. सरांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जीवनाचेही धडे दिले.
विद्यालयातील विद्यार्थी प्रसाद कोराळे याने सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.त्याचबरोबर त्यांचे मित्र, नातेवाईक, शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक बांधव, ग्रामस्थ विद्यार्थी मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना भरत बुरुंगले म्हणाले, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल केली पाहिजे, प्रयत्नाशिवाय काही साध्य होत नाही, अचूक संधी शोधून संधीचे सोने केले पाहिजे, कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. डी. खंडागळे यांनी केले. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात यांनी मानले.