
कराड ः सैदापूर ता. कराड येथे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. यामध्ये चोरट्यांनी सुमारे चार लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबतची फिर्याद इसाक वजिर मुलाणी (वय 61 रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापूर ता. कराड, सध्या रा. साई ॲन्टीलिया कॉम्पलेक्स जी बिल्डींग बी विंग दुसरा मजला रूम नं. 206 डिव्हाईन इंग्लिश स्कूल जवळ काल्हेरजवळ भिवंडी, जिल्हा ठाणे) यांनी शहर पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, इसाक मुलाणी यांच्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शनसाठी सैदापूर येथे आले होते. सर्व कार्यक्रम करून मंगळवार दि. 13 जानेवारी रोजी रात्री ते घराला कुलूप लावून सर्वजण भिवंडी येथे गेले. त्यानंतर बुधवारी इसाक यांचे मेहुणे यांनी त्यांच्या पत्नीच्या फोन वर फोन करून घराचा टाळा तुटलेला असून आतील साहित्य अस्ताव्यस्त पडले असून कपाट उघडे असल्याचे सांगितले. त्यांनतर इसाक मुलाणी यांनी सैदापूरला घरी येऊन पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटामध्ये पाहिले असता कपाटाचा ड्रॉव्हर दिसून आला नाही. कपाटाचे लॉकर बघितले असता त्यामधील रोख 60 हजार रूपये, 1 लाख 68 हजारांच्या सोन्याच्या आठ अंगठ्या, 98 हजार रूपये किमतीचे 14 सोन्याचे कॉईन, 35 हजार रूपये किमतीचा एक कॉईन व 35 हजार रूपये किमतीचे एक सोन्याचे पेंडल असा एकूण 3 लाख 96 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर करीत आहेत.
Tags
crime news Karad



